Ad will apear here
Next
नात्यांची वीण घट्ट करणारी दिवाळी


आठवणीतली दिवाळी या सदरात रत्नागिरीच्या सौ. अर्चना देवधर यांचा हा लेख...
.........
कौटुंबिक, सामाजिक ऐक्य जपण्यासाठी आणि संस्कृतीसंवर्धनासाठी सण-समारंभ साजरे करण्याची प्रथा आपण युगानुयुगे जोपासतो आहोत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी निसर्ग आपल्याला सहस्रहस्ते विविध रूपातून अमोल असं देणं देत असतो. निसर्गाशी जवळीक साधणं आणि त्याच्याबद्दल मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करणं यासाठीही सणांचं निमित्त साधून आपण एकत्र येत असतो, आनंद साजरा करतो!

सगळ्या सणांमध्ये अधिक आनंद देणारा आणि नात्यांची वीण घट्ट करणारा सण म्हणजे दीपोत्सव, अर्थात दिवाळी! आसुरी शक्तींवर विजय मिळवून समाजाला स्थैर्य आणि शांती प्रदान करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि त्या विजयाचा आनंद अभ्यंगस्नान आणि गोडधोडाचं सेवन करून व्यक्त करण्यासाठी अश्विन वद्य चतुर्दशी ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत हा आनंदोत्सव साजरा होतो. या सणाशी निगडित माझ्या लहानपणीच्या काही आठवणींना उजाळा देण्यासाठी हा लेखप्रपंच!

हासत नाचत दीपावली।
येणार येणार घरोघरी।
मातीचे रेतीचे किल्ले-
घर।
शिवाजी-तानाजी 
सरदार।
काढू या रांगोळ्या 
रंगदार।
चिमणी, पोपट, मैना-मोर 
भावाला बहीण 
ओवाळीते।
करू या नमन प्रणामाते।

या दीपनृत्याच्या तालावर प्राथमिक शाळेतून दसऱ्याचे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे व्हायचे आणि दिवाळीच्या आगमनाचे पडघम वाजू लागायचे. रत्नागिरी तालुक्यातलं पावसजवळचं नाखरे हे आमचं गाव. खेडेगावात लहानपण गेल्यामुळे भातकापणीचा हंगाम संपून घरात धान्याची कोठारं भरलेली असायची आणि दसरा झाला की आमची आजी
‘दसऱ्यापासुनी दिवाळी वीस दिशी।
मला माहेरी कधी नेशी भाईराया?’
ही ठेवणीतली ओवी म्हणून ‘आता दिवाळीला शिंगं राहिली नाहीत हो, तयारीला लागायला हवं’ असं प्रेमळ फर्मान सोडायची. पोहे कांडण्यासाठी भात भिजत घातलं जायचं आणि गावातल्या, शेजारच्या गावातल्या बायका एकमेकींकडे पोहे कांडायला जायच्या. सामाजिक एकोप्याची निदर्शक असलेली ही गोष्ट आज अभावानेच पहायला मिळते. ‘मला कुणाची लुडबुड आवडत नाही किंवा मला मीच केलेले फराळाचे पदार्थ आवडतात’ असली वाक्यं कुठे ऐकू येत नव्हती. फराळाचे पदार्थ करायला बायका एकमेकांकडे निर्मळ मनाने जायच्या. भाजण्यांचे खमंग वास आसमंतात दरवळू लागायचे. 

१९६०-७०च्या माझ्या बालपणीच्या काळात दिवाळीत मुख्य पदार्थ पोहे आणि करंजी-कडबोळी हे जास्त प्रमाणावर केलं जायचं. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी जळवण जमवणं, अभ्यंगस्नान झाल्यावर नरकासुराचं प्रतीक म्हणून फोडण्यासाठी कारेटी आणून ठेवणं, अंगाला लावायला टाकळ्याचं बी, नागरमोथा या सुगंधी वनस्पतीचे कंद आणणं ही कामं बाळगोपाळांची असत. चिव्याच्या कामट्यांपासून केलेला आकाश कंदील अंगणाची शोभा वाढवीत असे. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून रोषणाईची तयारी करणं हा दिवाळीच्या तयारीचा मुख्य भाग. गेल्या दिवाळीनंतर तुळशीचं लग्न झालं की नीट ठेवून दिलेल्या पणत्या घासून पुसून स्वच्छ करणं आणि त्या ताटात मांडून ठेवणं ही मुलीबाळींची कामं असत. 



फराळाच्या तयारीत घरातल्या लहान मुलांची लुडबुड स्वागतार्ह असे. ‘लुडबुड केल्याशिवाय शिकणार कसं’ हे वाक्य आजी-आजोबांसारखी पिकली पानं आपल्या लेकी-सुनांना ऐकवत असत. मला चांगलं आठवतंय, माझी आजी शिस्तीला बोलणारी होती; पण करंज्या-कडबोळी करायला आम्ही बसलो, की आमच्या हौसेची कदर करत आजी छोट्या करंज्या, कडबोळी आम्हाला करायला सांगायची, जी नंतर छोट्या डब्यांमधून भरून ठेवली जायची. भातुकलीच्या वेळी उपयोगी येतील हा हेतू असायचाच त्यात; पण देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय फराळाच्या मुख्य भांड्यांना हात लावायचा नाही हा प्रघात होता. सोवळ्या-ओवळ्याचा पगडा अजून थोडाफार होताच; पण डब्यांची झाकणं सैल लावली जाऊ नयेत, वस्तू वाया जाऊ नयेत ही काळजीही घेतली जात असे. इथे उल्लेख केल्यावाचून राहवत नाही ती गोष्ट म्हणजे शेतीची वा अन्य कामांची कितीही गडबड असली तरी ‘सगळी तयारी करून ठेव, करंज्या भरून द्यायला मी मदत करीन’ असं न चुकता आमच्या आईला माझे वडील सांगायचे. अगदी नीटसपणे त्यांनी भरून दिलेल्या करंज्या अजूनही चांगल्या आठवतायत मला. 

वसुबारसेला गायीची पूजा करून तिच्या तोंडात करंजी, दिली की खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू व्हायची. धनत्रयोदशीला पिठाचा दिवा करून तो दक्षिणेला ज्योत ठेवून अंगणात लावला जायचा. नरक चतुर्दशीच्या दिवशी भल्या पहाटे थंडीत कुडकुडत आजीकडून अंगाला तेल लावून घ्यायचं आणि अंघोळीला पहिला नंबर कुणाचा लागतो यासाठी झटापटी करायच्या हा भावंडांचा उद्योग. बाकी सगळ्या अंगाला आजी किंवा आई तेल लावायची; पण आपल्या तोंडाला मात्र स्वतःच तेल लावायचं नाही तर माकडाचा जन्म येतो हे आम्हाला सांगितलं जायचं! नाही केलं तर काय होईल हे विचारायची प्राज्ञा नसायची. 

आंघोळी झाल्या की सगळे देव घासून त्यांनाही उटणं, अत्तर यांसह अभ्यंगस्नान घालून यथासांग पूजा केली जायची. नैवेद्याला गुळाच्या आधणात शिजवलेले पोहे आणि बाकी फराळाचे पदार्थ असायचे. माहेरी पूर्वी खोती होती. खोती नष्ट झाली तरी प्रथा संपल्या नव्हत्या. बारा बलुतेदार फराळासाठी आमच्या घरी यायचे. ओटीवर ही मोठी पंगत बसायची. गोड पोहे, वर नारळाचं दूध आणि करंजी कडबोळं असा फराळाचा थाट असे. गोरगरीब कष्टकरी लोकांना वर्षाकाठी एकदा असं फराळाचे पदार्थ असलेलं भरलेलं पान दिसत असे, एरव्ही पेज-भाकरी हाच आहार बारा महिने मिळायचा. सगळ्या जातींचे लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने फराळ करून भरल्या पोटी घरी जात असत. गावातल्या रामेश्वर, देवी, भगवती इथल्या देवळांचे गुरव फराळाचा आणि दुपारी जेवणाचा नैवेद्य न्यायला येत असत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अंगणभर लावलेल्या पणत्या आणि घरात धान्यांनी भरलेल्या भांड्यांची पूजा हा मोठा आनंदसोहळा असायचा. 

दिवाळीच्या चार दिवसांतला लक्षणीय दिवस म्हणजे भाऊबीजेचा! माझ्या मोठ्या आत्याकडे रत्नागिरीला वडील ओवळणीसाठी यायचे, बरोबर आम्हीही यायचो. वर्षातून या दिवशी न चुकता रत्नागिरीला येणं ही मोठी पर्वणी असायची. आत्याच्या घरासमोर लता टॉकीज होतं आणि आसपास आइस्फ्रूटची गाडी असायची. ते खायला मिळेल हे आकर्षण असायचं. भाऊबीजेची ओवाळणी झाली, की समोरच्या पानाच्या गादीवरून आणलेलं मसालापान खायला मिळायचं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद लपलेला असायचा! देवळांमधून दाखवले जाणारे देखावे कधीमधी बघायला मिळायचे. रत्नागिरी आजच्याइतकी गजबजलेली नव्हती; पण खेड्यात पाहायला न मिळणाऱ्या गोष्टींचा आनंद अल्प काळ अनुभवायला मिळायचा त्याची गंमत वाटायची!

काळ बदलला, तशी सण साजरे करण्याची पद्धतसुद्धा बदलू लागली. भाऊबीजेला भावाला ओवाळलं की त्याने दिलेल्या छोट्याशा ओवळणीतूनही अवर्णनीय आनंद मिळायचा. भावाने ओवाळणी म्हणून सुपारी घालायची आणि बहिणीने नारळ भेट द्यायचा ही खरी भाऊबीजेची रीत! ओवाळणीच्या वस्तूपेक्षा भाऊ बहिणी एकत्र जमून विसाव्याच्या क्षणी चार घटका सुखदुःखाच्या गोष्टी करतील हा मुख्य हेतू असायचा. 

‘भाऊबीजेच्या दिवशी ओवाळीन तुला।
जरीचा खण मला। भाऊराया।।’

या एका ओवीतून पूर्वीच्या भाऊबीजेच्या आनंदाची कल्पना येते!

काळानुसार बदल हे होणारच; पण मोठमोठ्या भेटवस्तू दिल्यानेच प्रेम वाढतं असं नाही, तर निर्व्याज संवादातून येणारी मजा खूप काही देऊन जाते असं वाटतं!

आज सगळीकडे सगळ्या बाजूंनी सुखवस्तूपणा ओसंडून वाहतोय; पण माणसांमधला संवाद कमी होत चाललाय. या पार्श्वभूमीवर साध्या-सरळ जीवनपद्धतीतसुद्धा पूर्वीच्या खेडूत आयुष्यात साजरे केलेले दिवाळीचे दिवस स्मृतिपटलावर कायम कोरले गेलेत, त्या आनंदाची गोडी अवीट आहे, जशीच्या तशीच!

- सौ. अर्चना अशोक देवधर, साईनगर, रत्नागिरी
मोबाइल : ९४०३९ ३६४७६
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YWAGCS
Similar Posts
दिव्याचे तेज... तरुण चित्रकर्तीच्या कुंचल्यातून दिवाळीनिमित्त रत्नागिरीतील तरुण चित्रकार आणि भावी आर्किटेक्ट श्वेता केळकर हिने काढलेले दिव्याचे हे चित्र आणि त्या संदर्भात व्यक्त केलेले विचार...
दिवाळी बदलली, पण मिळणारी ऊर्जा कायम! दिवाळी साजरी करण्याची प्रत्येक पिढीची संकल्पना फार वेगळी आहे; पण दिवाळीतून मिळणारा आनंद आणि ऊर्जा कायम आहे... कोकणातील चेतना धोंड्ये (जोगळेकर) या तरुणीने आपल्या वडिलांच्या आणि आपल्या काळातील दिवाळीच्या आनंदाच्या कल्पनांबद्दल लिहिलेला हा लेख... आठवणीतली दिवाळी या सदरात...
पण लक्षात कोण घेतो??? तिशीपर्यंत विवाह न होणे ही फार मोठी सामाजिक समस्या आहे आणि याचे कारण पुरुषप्रधान संस्कृतीचे समाजाने निर्माण केलेले विकृत दडपण आहे. आधुनिक स्त्री घडवताना समाजाने पुरुषावर सर्वार्थाने अन्याय केला आहे. मुले आणि मुली समान शिक्षण मिळवतात. दोघेही जण सध्या नोकरी, व्यवसाय करून अर्थार्जन करतात. परंतु सामाजिक
दिवाळी म्हणजे समृद्ध आठवणी : बुजुर्ग अभिनेते श्रीकांत मोघे यांचा व्हिडिओ ‘माझ्या दिवाळीच्या आठवणी किर्लोस्करवाडी आणि पुण्याशी निगडित आहेत. किर्लोस्करवाडी हे प्रचंड सुबत्तेचं ठिकाण. त्यामुळे माझ्या आठवणीही अत्यंत समृद्ध अशा आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, पदार्थ नि फटाक्यांपर्यंतच्या सगळ्या आठवणी तितक्याच सुंदर...’ बुजुर्ग अभिनेते श्रीकांत मोघे... यांनी सांगितलेल्या आठवणींचा , ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संग्रहातील हा व्हिडिओ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language